Me Sahyadri |
Jan 2020 |
Volume 7, number 1, # 89 |
Gram devataa – Around Pune (Right/south side) |
Please use minimum 1280 pixel horizontal screen resolution for viewing. Please be patient while all the images in webpage are loaded. Please do not use the images for any commercial use without permission. Text in Marathi and English is not exact translation. Please give sufficient time to allow the photographs to load. Special thanks to those who helped me during the compilation and for the help and guidance during the activity. |
|
|
देशाची आर्थिक प्रगती व्हावी असे सर्व नागरिकांना वाटणे सहाजिक आहे. अर्थकारणामुळे मिळणारा रोजगार, समृद्धी यासाठी सर्वांनाच आर्थिक प्रगती हवी हवीशी वाटते. आर्थिक प्रगती होताना, त्याचा दिर्घकाळात समाजावर, निसर्गावर, वातावरणावर दुष्परिणाम होणार नाही याची काळजी घेणे महत्वाचे आहे. मनुष्याच्या भावी पिढ्यांना पाणी, शुद्ध हवा, योग्य वातावरण मिळत रहावे अशी भावना मनात रुजणे महत्वाचे आहे. वाढत्या आर्थिक प्रगतीमुळे नैसर्गिक संपदेवर ताण येतो. प्रगतीसाठी प्रदुषण होते. जंगले, माळराने, व इतर अधिवास नष्ट होतात. वसुंधरेवर रहाणाऱ्या इतर जीवांचा मात्र मनुष्य फारसा विचार करत नाही. आर्थिक प्रगती करताना, मनुष्य निसर्गाची हानी करत आहे. मुळताच माणसाला निसर्गाचे महत्व समजणे हे सध्याच्या आपल्या प्रगत जीवनशैली मुळे अवघड झाले आहे. आर्थिक प्रगती, समाजाची प्रगती व निसर्ग संपदेची निगा, यांचा समतोल राखणे काळाची गरज आहे.
सह्याद्री (पश्चिम घाट) हा एक नैसर्गिक संपदेचा, वैविध्यतेचा, भौगोलिक व ऐतिहासिक ठेवा आहे. वाढत्या मानवी अतिक्रमणाचा, सह्याद्रीच्या विविध घटकांवर होणारा दुष्परिणाम भविष्यात आपल्यालाच धोका निर्माण करेल, यात शंका नाही. शुद्ध पाणी, हवा व उर्जा, भावी पिढीला मिळण्यासाठी, नंद्यांचे उगम असलेला सह्याद्री व त्याभागातील जंगले टिकवणे महत्वाचे आहे. सह्याद्रीच्या महत्वाच्या घटकांचे महत्व छायाचित्रांद्वारे प्रकट करण्याचा मी येथे प्रयत्न केला आहे. येथील पक्षी, प्राणी, वनस्पती, अधिवास, किल्ले व लेणी अशा विविध विषयांबद्दल आपण समजुन घेऊ.
|
|
As the economic development has taken the center stage, the balance between the environmental sustenance and socio economic development will be under the scanner. As most experts with balanced views have proclaimed, Indian wildlife and ecological system sustenance will be under threat, unless precautions are taken with the help of appropriate research and long term national interests. As we encounter the economic development, many habitats which indirectly or directly help sustainable development will be damaged. The awareness to gauge the success by sustainable development and not by year to year growth is a distant dream any environmentalist will assume in current scenario.
Western ghats, or Sahyadri as we all call it as, is a treasure trove of spectacular landscapes, biodiversity, flora, fauna, some amazing geological wonders and man made monuments. With the increasing pressure from human encroachment, all these elements are under stress and in turn are under depletion. Western ghats should be right untouched by human beings, to protect their future generations from getting short of resources, such as water, energy and clean air. The important elements of western ghats, which need protection are highlighted in the new version of Photo journal, Me Sahyadri Magazine.
|
|
|
|
|
|
Me Sahyadri – January 2020
|
|
|
|
|
The banner has been published here to improve the awareness of the trekkers and tourists visiting the various mountain forts, mountains in south western ghats. Please avoid accidents, by following good outdoor ethics such as no swimming in cisterns at mountain forts, no rock climbing without proper technical equipment and expertise. Please do not adventure, trek with any group or individually without understanding the risks associated. The frequency of the solo trekker fatalities have increased recently. Please strictly avoid solo treks. Please also avoid treks to mountains in large commercial groups, as it leads to damage to biodiversity of these high elevation ecological islands. Please respect the wildlife and biodiversity of the region. This has become more important as the ever increasing human interference is leading to severe damage to fragile ecosystems. Please be aware of the wildlife and biodiversity of the mountains before visiting these mountains. Please follow outdoor ethics. Follow ASI and Forest department rules. The concept of use of symbols for outdoor ethics was conceived and designed by "Sahyadri Trekker Bloggers Group". |
|
|
|
|
|
1. Bedse’s Waghoba deity, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
पवन मावळ आणि नाणे मावळ यांच्या मध्ये विसापुर डोंगर रांग लांब लचक पसरलेली आहे. पवन मावळातुन नाणे मावळात जाताना भातराशी डोंगराच्या पुर्व बाजुस एक खिंड आहे. पिंपळोली, कडधे, बेडसे आणि पंचक्रोशीतल्या गावांचा हा देव. खिंडीत वाघोबा आणि तुफान वारा या दोघांचा मुक्क्काम आहे. येथील गावकरी वाघोबा ला मानतात. दिवाळीआधी वाघोबाची जत्रा असते. खरिप हंगामाच्या अखेर देवाने केलेल्या उपकारांसाठी त्याच्या चरणी इथले शेतकरी येतात. पुर्वी साधी देवडी होती. नंतर त्याच्यावर कच्चे देऊळ
|
|
बांधले गेले. आता देवडी राहिली नाही. देउळ चकाचक झाले, देवडी मोडली. देवळाबाहेर वर्षोंवर्षे देवासमोर वाहिलेले दगडी बैल विखुरले. बुल्डोझर आला. चकाचक सिमेंट्चे फरश्या असलेले देउळ तयार झाले. वाघोबा ला मात्र आता वाऱ्याबरोबर गप्पा मारता येत नाहीत. देव सोपा झाला. आधी चार एकशे फुट घाम गाळत भक्त डोंगर चढुन वर यायचा. आता दुचाकीला किक मारली तर माणुस थेट देवळात पोहोचतो. जुन्या देवडीची आठवण करत आणि विखुरलेले नंदी बैलजोड़्या नीट रचुन आम्ही देवाचा निरोप घेतला.
|
|
|
|
|
|
2. Sun Hypnosis at Markud, Bedse Chaityagriha, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
पवन मावळात बेडसे लेणी समुह पश्चिम महाराष्ट्रातील एक अद्वितिय लेणी आहे. येथे असलेल्या मुख्य चैत्यगृहात प्रवेश केल्यावर एक वेगळीच चेतना जागृत होते. चैत्यगृहाचे मुख्यद्वार अचुक पुर्व दिशेकडे आहे. वर्षातुन दोनदा सुर्य मुख्यद्वाराच्या थेट समोर येतो. स्तुपाच्या आणि मुख्य द्वाराच्या उभ्या अक्ष पतलाला जेंव्हा सुर्य छेदतो, तेंव्हा सुर्य प्रकाश चैत्यगृहात किमया करतो. अनेक वर्ष या किमयेचा अभ्यास करता करता मला हा अलभ्य लाभ मिळाला. स्तुपातुन बाहेर पडणारी वैचारिक उर्जा मनाला छेदुन गेली. वास्तवातुन शुन्यतेकडे प्रयाण सुरु झाले. इथल्या पाषाणी हजारो वर्षे मुरलेल्या तत्वज्ञानातुन पाझरलेली थोडी बुद्धी जणु प्रसाद म्हणुन मिळाली. या प्रसंगानंतर मी झपाटल्यासारखे या विषयावरचे वाचन सुरु केले. बौद्धिक पातळी थोडी उंचावली. उदासिनता कमी झाली.
|
|
एक दिशा मिळाली. मृत्यु आणि जीवन सुंदर करण्यासाठी एक वाहन मिळाले. इथल्या प्रकाशात माझा मी पणा कायमचा हरवला. सुर्यसंमोहनातुन अनंत उर्जा मिळाली. चैत्यगृहाची आखणी त्याची मोजमाप येथे येणाऱ्या भाविकाला सम्मोहित करतात हे जेम्स बर्जेस या इंग्रज अभ्यासकाने ताडले होते. येथील रचनेतील प्रमाणबद्धतेचे कौतुक त्याने आपल्या लेखनात मांडले आहे. इथे येणारा प्रत्येक जण भाविक असतोच असे नाही. या ठिकाणी येताना लागणाऱ्या भौतिक पायऱ्यांच्या सुद्धा अजुन वर जे वैचारिक तत्वज्ञानाच्या पायऱ्या चढतात ते मात्र नक्की संमोहित होतात. पण त्यासाठी भौतिकतेपासुन थोडे अंतर ठेवावे लागते. हवेत तरंगावे लागते. पण एकदा तरंगायला शिकले की मग त्यात काही वेगळेच सुख आहे.
|
|
|
|
|
|
3. Navlakhyaa Bhairoba deity, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
नाणे मावळ आणि भामा खोरे यांच्या मध्ये तसुबाई ची लांबच लांब आणि दोन्ही कडुन चांगलीच तासलेली उंच डोंगररांग आहे. अधुन मधुन क्वचितच उतरलेल्या धारा आणि दोन टोक सोडली तर ओलांडणे नामुश्किल. तसुबाईच्या पुर्व बाजुस नवलाख उंबऱ्याच्या वर एक खिंड आहे. मोठा हेलपाटा घालत का होइना इथुन पल्याड जाता येते. खिंडीतुन दोन्ही कडचा माथा चढणे म्हणजे घसार्यावर चढणे. वरुन खाली उतरणे म्हणजे घसरगुंडीच आहे. एकदा मी आणि अमेय भैरोबाच्या या खिंडीत गेलो. गावतल्या गुराख्याची पिशवी दिसली. मात्र गुराखी काही दिसेना. पहातो तर मोबाईल चाळत मस्त झाडाच्या फांद्यांवर असलेल्या मचाणावर गडी पहुडला होता. खिंडीच्या पश्चिमेला चढणीवर एक देवळी आहे.
|
|
देवळीत भैरोबा आहे. संगतीला जोगुबाई जोगेश्वरी आहे. दोघे जेमतेम तीन फुट बाय तीन फुट देवळीत रहात्यात. त्यांच उन वारा पाऊस यांपासुन माणसान केलेल संरक्षण. डोंगररांग रुबाबदार आहे. तसुबाई एकटी नाही. तीच्या संगतीला अल्याड आणि पल्याड भरपुर देव मंडळी आहेत. भैरोबा च्या मुर्तीवरच शेंदराच कवच निघाल आहे. कवच काढुन देव आपल्याला दर्शन देतोय असा भास झाला आणि धन्य झालो. वरच्या टेपावर आहे तेवढेच पाणी; इकड खाली पाणी नाही. गुराखी म्हणाला. टेपाडा वरची अर्धवट नैसर्गिक आणि अर्धवट मानवनिर्मित पाण्याची जागा पाहुन आम्ही परतलो.
|
|
|
|
|
|
4. Waghjai godess deity, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
नाणे मावळ आणि पवन मावळाच्या मध्ये पसरलेल्या विसापुरच्या डोंगररांगेत एक बलाढ्य डोंगर आहे. या डोंगराला सातेचा डोंगर असे म्हणतात. सुपवती हे या डोंगराचे अजुन एक नाव. सुपवतीच्या पुर्व बाजुच्या धारेवर एका लहान पदरावर (माचीवर) एक लहान डोंगरवाडी नावाचे गाव आहे. आम्ही वाडीत पोहोचलो तेंव्हा इथली लहान घर निजली होती. घामाच्या धारा गाळत कावडीतुन दुध घेउन जाणारे इथले गुराखी आणि कामकरी लोक वडगावाकडे पटापट डोंगर उतरत होते. ते उतरत होते आणि आम्ही डोंगर चढत होतो. दुध वडगाव, लोणावळा, तळेगाव या जवळच्या गावात विकतात. परत डोंगर चढतात आणि विसावतात. हे कष्टाचे धनी लोक डोंगराच्या पुर्व माथ्यावरच्या अरुंद धारेवर ढगांच्या वर, पर्जन्यशिल्प पाषाणांच्या पुंजक्यात रहाणाऱ्या वाघजाईला पुजतात. डोंगरवाडीवरची
|
|
वाघजाई. नवरात्रीत गावकरी देवीची पुजाअर्चा करतात. नवस बोलले जातात. यंदा पावसाळा लांबला. नवरात्रीत सुद्धा डोंगरावर ढगांची धावपळ चालु होती. मधल्या खिंडीतुन पश्चिमेकडचे ढग खिंडीतुन उंच भरारि घेत डोंगरावरुन पल्याड जात होते. काही खालच्या दरित घुटमळत होते तर काही पुर्वेच्या कोरड्या हवेत विलिन होताना दिसले. ढगांच्या वर निरभ्र आकाशाखाली एका आडोशाला वाघजाईच ठाणं आहे. देवीला पाया पडुन आम्ही डोंगर उतरलो. परतताना मधल्या माचीवरच जंगल न्याहाळल. शहराच्या जवळ या भल्या डोंगराने राखलेल जंगल पाहुन त्याच मनोभावे कौतुक केल. सुपवतीवरुन मावळाचा पसारा दिसतो. दोन्ही बाजुस गिरक्या मारत जाणाऱ्या इंद्रायणी, पवना यां वरदायीनींच दर्शन झालं. त्यांच्या भवतालच्या डोंगरदेवांच नामस्मरण करत आम्ही डोंगर उतरायला घेतला.
|
|
|
|
|
|
5. Kalbhairav deity, Shilatane, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
मावळात कार्ले लेण्याच्या समोरच्या पठारावर पुर्वेकडे डोंगराच्या कुशीत शिलाटणे नावाचे गाव आहे. जुन्या व्यापारी मार्गावरचे गाव आज सुद्धा पुणे -मुंबई या मुख्य व्यापारी मार्गाच्या जवळ आहे. शिळांवर म्हणजे कातळावर वसलेल गाव म्हणुन या गावाचे नाव शिलाटणे असावे. गावाच्या पल्याड रानात एक देव आहे. भैरवनाथाचे देऊळ गावापासुन दुर रानात आडवाटेला आहे. मुळचा गुराख्यांचा देव असावा. हा देव एवढ्या आडवाटेला का आहे असा माझ्या समोर प्रश्न उभा राहिला. सोबत कोणीच नव्हते. एका दिवशी दुपारचे जेवण घरी आटपुन मी लोणावळ्याकडे जाणारी विजेवर धावणारी रेल्वे पकडली आणि तीला मळवली ला सोडली. मळवली वरुन शेताशेतातुन भैरवनाथाच्या देवळाकडे चालायला सुरु केले. तास भर चालल्यावर डोंगराच्या बेचक्यात पोहोचलो. आडरानावर असलेल्या शेतांच्या बांधाबांधा वरुन एकदाचा देवळा जवळ पोहोचलो. देवाचे दर्शन झाले. एका भाविकाकडुन खोबऱ्याचा प्रसाद मिळाला. माळावर काही गावकरी गवत कापत होते. त्यांची अधुन मधुन एक्मेकांशी केलेल हितगुज सोडले तर बाकी शांतता होती. भैरवनाथ इथे एकटाच आहे. त्याची एक लहान देवळी आहे. देव फार कडक आहे. गावकऱ्यांनी येथे सुद्धा आता मोठे देऊळ बांधले आहे. अजुन फरशी काम बाकी आहे. मात्र देवाच्या भीतीमुळे त्यांनी मुळ दगडी देवळीला धक्का पोहोचवला नाही. दिवाबत्ती करुन मी देवळाच्या आजुबाजुला पहायला सुरुवात केली. अंगणात छान चाफ्याच झाड आहे. अजुन काही देव तांदळे देवळाबाहेर रचुन ठेवले आहेत. लहान दिपस्तंभ आहे.
|
|
पण देऊळ अशा आडवाटेवर का ? हा प्रश्न अनुत्तरीत राहिला. देवळाच्या मागे एक कोरडा ओढा आहे. ओढ़्यातुन वरच्या दिशेला थोडे गेल्यावर उत्तर मिळाले. भर जानेवारीत सुद्धा इथे एक पाण्याचा स्त्रोत दिसला. लहान नैसर्गिक कुंड दिसले. त्यातले पाणी स्वच्छ होते. जीवंत पाणी म्हणुन देव, हे समीकरण जुळले. पाण्याभोवतालच्या कातळात सोंगट्या वापरुन खेळायचे खळगे दिसले. सोंगट्या आणि सोंगटया खेळणारे मात्र आता नाहीत. पुन्हा देवळात येउन पाया पडुन मी परतीच्या वाटेला निघालो. परतताना वेगळी वाट पकडली. विहिरगावाकडे जाताना, वाटेत मोर दिसले. अचानक एका धारेवर एक कातकरी पाडा दिसला. ७-८ खोपट होती. खोपटाबाहेर पोर खेळत होती. आडवाटेला आलेल्या शहरी माणसाकड नजर रोखुन पाहात होती. माझ्याकडे त्यांना देण्यासाठी काहिच नव्हते. पाठीवरच्या पिशवीत चाचपडल्यावर एक पारले चा पुडा सापडला. त्यातील एक एक बिस्किट काढुन पोरांना वाटली. एक पोऱ्या एक बिस्किट असा हिशोब जमला. एक बिस्किट उरले. ते मीच गट्टम करुन धारेवरुन खाली पठारावर उतरलो. पठारावर एका दुचाकीवाल्याने चौकशी केली. इकडे देव दर्शना साठी आलो असे सांगितल्यावर त्याने थेट कार्ले फाट्यापर्यंत लिफ्ट दिली. देवाच्या महतीबद्दल गप्पा झाल्या. भैरवनाथ फार कडक आहे. असे तो माणुस म्हणाला. देव मानला तर उत्तम आणि नाही मानला तरी चालते, असे मी म्हणालो. त्यावर त्याने चपखल उत्तर दिले, "देव खरा असत्योच की, मानण्या न मानण्याचा प्रश्नच नाही." अशी स्वत:वर आणि श्रद्धास्थानावर विश्वासाचा समतोल राखणारी माणस शहरी माणसाला क्वचितच भेटतात.
|
|
|
|
|
|
6. Waghoba, Borivali plateau, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
चाकोरी वाघोबा :
एका सुट्टीच्या दिवशी अलभ्य लाभ झाला. तळेगावचे दोन हुन्नरी माणस, अमित गुरव आणि रुपक साने सर, आमच्या पलटणी बरोबर भटकंतीला आली. डोंगररांगेच्या २०-२२ किमी दोन टोकांना दोन वाहने लावुन आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. नुकताच वाढीव पावसाळा संपला होता. वातावरण आल्हाददायक होते. थोडया चढणीनंतर वाट वाकडी झाली. इकड कुठ तिकड जायच आहे असे हाकारे झाले. मात्र वाट आमच ऐकत नव्हती. वाट एका घसाऱ्यावरुन एका गुहेसमोर येऊन थांबली. कोण्या भल्या माणसाने या गुहेला दगड खाणीपासुन वाचवले होते. प्राचिन गुहेत वाट शिरली. मुळच्या नैसर्गिक गुहेत, कुण्या तत्ववेत्त्या मंडळींनी कोरिव काम केले आहे. पाण्याचे टाके, लहान देवघर, भिंतीवर लिहिलेला शिलालेख असा भन्नाट ऐवज या गुहेत गेले २००० वर्ष थाटला आहे. शिलालेखाची अक्षर न्याहाळली. तोच तो. इदरखित. भयंत इदरखित. लोहगडावर आम्हाला सापडलेल्या शिलालेखातला इदरखित. तेच शब्द, तेच मंगलाचरण. नमो अरिहंतानम ! केवढा हा योगायोग. आम्ही अरीहंतांना नमन करत गुहेतुन बाहेत पडलो. आता कुठे जायचे ? वाट घेऊन जाईल तिथे, असे उत्तर आले. वाट उभ्या चढणीवरुन माथाकडे जाऊ लागली. धारमाथ्यावरुन वाट मुख्य डोंगररांगेकडे घेऊन जाऊ लागली. वाट आता कारवीत शिरली. उतारावर तेरडा छान गुलाबी नटला होता. मधमाश्यांना आव्हान देत होता. कारवी, तेरडा आणि सोनकी यांना वाऱ्याबरोबर झुलवत वाट मुख्य डोंगरावर पोहोचली. इथुन अजुन १५ कि मी पुढे जायचे होते. ढाक च्या बहिरीला साद घालायला चालली होती ही वाट. मुख्य डोंगररांगेव आल्यावर वाट सुखावली. रुंद झाली पण पठारामुळे बहरली. रानातुन वळण घेउ लागली. गर्द राईत शिरु लागली. राईतुन बाहेर पडताच सोनकीने सोनेरी होत होती.
|
|
तर अचानक जांभळ्या मंजिरिच्या पाणथळीशी सलगी करत होती. वाट आता चाकोरीच्या मागे लागली. कुण्या काळात कातळात केलेल्या चाकोरीतुन चालत वाटेने आम्हाला काही काळ भुतकाळात नेले. आता आमच्या पुढे मागे बैलगाड़्या होत्या. व्यापारी वस्तु घेऊन कल्याण ला चालले होते. तिथुन माल इजिप्तला. अचानक वाट राईत घुसली. आम्हाला वाघजाई समोर घेउन जात थबकली.दोन तीन गोल गोटे आणि त्यांच्या सोबतीला लहान फुटभर लांब त्रिकोनी स्तंभ शिळा असा साधा मुखडा होता वाघजाईचा. वाट पुन्हा वर्तमानात आली. व्यापाऱ्यांचा तांडा आता पुढे निघुन गेला. कातळातल्या बेचक्यांतल्या गवतावतुन वर आलेल्या बंबाकुच्या तुऱ्यांनी वाट थोडा वेळ थांबवली. तर पाणथळीत कातळावर फुललेल्या सितेच्या आसवांनी डोळे दिपवले. दोन चार घर सोडली तर पठारावर घर नाहीत. चाकोरी नेइल तिथे वाट जात होती. अचानक चाकोरी गायब झाली.
वाट हरवली. मागच्या घरावर जाऊन माणस गाठली. इकड कुठ. तर आम्ही वाघोबा ला अस सांगुन त्यांचा निरोप घेतला. त्यांच्या विहिरीच पाणी चाखल आणि निरोप घेतला. पुन्हा वाटेला चाकोरीत आणुन सोडले. आता वाट मात्र घाबरली, थोडी हबकली निर्बिड रानात अचानक समोर दलदल होती. म्हशी रेडे त्यात निवांत लोळत होते. वाटेने आता म्हशींपासुन अंतर राखुन आम्ह्लाला वित भर चिखलात चालवले. एकदाचा वाघोबा दिसला. वाट दमली. न्याहारी झाली. खाउ च्या पिशव्या बाहेर आल्या. खाऊने पटापट सर्वांच्या पोटात उड़्या मारल्या. एक गावतला पोऱ्या आला. त्याने आमची चौकशी केली. इकडे कुठे असे विचारले. आम्ही वाघोबा कडे पाहिले. त्याची ओळख सांगितल्यावर पोऱ्या हबकला.
|
|
|
|
|
|
7. Padmavati , Tikona, Pune district, Maharashtra, India
|
|
|
तिकोणा किल्ल्यावर वरच्या भागात कातळात कोरलेली काही लेणी आहेत. येथील लेण्याचे द्वार उत्तरेकडे आहे. येथे असलेल्या चार विहारांपैकी एका गाभाऱ्यात तळजाई देवीची पुजाअर्चा होते. या गाभाऱ्याची उंची २.१ मीटर, लांबी २.१ मीटर व रुंदी २.२ मीटर आहे. द्वाराची रुंदी ०.७५ मीटर आहे. हि गाभाऱ्याची मोजमापे गडाच्या दक्षिणेकडे असलेल्या लेण्यांच्या गाभाऱ्याशी मिळत्याजुळत्या आहेत. गाभाऱ्यातल्या कोपर्यांना भिंतीपट्ट्या आहेत. गाभार्याच्या छतावर
|
|
कोरलेले नक्षीकाम आहे. नक्षीकाम वर्तुळाकार असुन त्याचा व्यास १.५ मीटर व खोली उंदाजे ०.३६ मीटर आहे. गाभाऱ्यात मागच्या भिंतीवर एक कोरलेली मुर्ती (जैन ?) आहे. गाभाऱ्या बाहेर असलेल्या छतावर द्विपदरी एकुण १६ पाकळ्या असलेले पुष्प कोरलेले आहे. गडाच्या वर व गडाच्या खाली असलेल्या दोन लेणे समुहामध्ये काही प्रमाणात साधर्म्य आहे. हे लेणे इसवीसन नंतर सातव्या आठव्या शतकातले असावे असा अंदाज आहे.
|
|
|
|
|
|
8. Ganesh deity at the entrance of old house (waadaa), Satara district, Maharashtra, India |
|
|
वाठार जवळ कुण्या एका जीर्ण पडक्या वाड़्याच्या दरवाजावर एक गणेश पट्टी पाहिली. चिंतामणी गोसावींनी लिहिले आहे " दास चिंतामणी विनवी चरणी, राहिन मी तुझे पायी मज आणिक ठाय नाही. " तर धरणीधर स्वामींनी लिहिले आहे "देवा हेचि मज द्यावे, तुझे भजन घडावे. जे मी करेन अवलोकन तेथे तुझेची स्फुरण, जिकडे माझे मन जावे तिकडे शुंडायुक्त पहावे. याचक धरणीधर विनवी. दासा कृपा ऐसी व्हावी." तर समर्थांनी लिहिले आहे " दर्शन मात्रे मन: कामना पुरती". संत ज्ञानेश्वर लिहितात : "अकार चरणयुगुल, उकार उदर विशाल, मकार महामंडळ
|
|
मस्तकाकारे, दे तिन्ही एकवटले तेथ शब्दब्रह्म कवळले. ते मियां गुरुकृपा नमिले, आदिबीज." योग्य तत्वज्ञानाच्या अनंत पायऱ्या चढत माणुस जेंव्हा स्वत: निर्गुणांचा मुळारंभ होतो तेंव्हा त्याला बोधिसत्व प्राप्त होत असावे. आजचा माणुस मात्र भरकटलाय. एवढ्या सुंदर तत्व सुरचना पाठिशी असताना तो असा कसा डगमगला? हा एक प्रश्न पडतो. का तो परस्पर विरोधी तत्वज्ञानाच्या गुंतागुंतीत कायमचा गुरफटला आहे? चंगळवाद्यांनी त्याला कदाचित कायमच फरफटत नेल आहे !
|
|
|
|
|
|
9. Hanuman, Walen , Pune district, Maharashtra, India |
|
|
वाळेणची वाघजाई आणि मारुती
बऱ्याच दिवसांपासुन बेत शिजत होता. पण जमत नव्हते. एका रविवारी अचानक मुहुर्त लागला. शनिवारी झालेल्या विसापुर-लोहगड-तिकोना वारीतुन थोडा थकवा आला होता. तरी रविवारी सकाळी तळेगावच्या अमेय ला सोबतीला घेऊन आम्ही मावळ-मुळशी तालुक्यांची सीमा गाठली. डोंगर माहित होता पण पायथ्याला कसे पोहोचायचे हे माहित नव्हते. हाडशी फाटयावर एका लहान एकांड़्या दुकानात चौकशी केली. दुकानातल्या मामांनी, देव दर्शनासाठी चाललोय असे म्हणल्यावर दुकानातुन बाहेर येउन डोंगराकडे जाणारी वाट दावली. हाडशी देवळाच्या गाडी तळातुन पल्याड डोंगराच्या पठाराच्या मागच्या बाजुस गेलो. इथे कच्चा रस्ता आहे. मात्र सपाटी असल्यामुळे वाळेण च्या एका धनगरवाडी ला सहज पोहोचलो. धनगरवाडीतल्या एका घरासमोर गाडी लावली. इन मिन इथे चार पाच घरे होती. एका बाजुला डोंगर उंच तर दुसऱ्या
बाजुला पठार. आणि तिसऱ्या आणि चौथ्या दिशेला रान असा इथला पसारा पाहुन त्या गावकऱ्यांचा हेवा वाटला. गावातले मामा जवळच्या गावाकडे दाढी करायला चालले होते. त्यांनी वर डोंगरावर कसे जायचे ते सांगितले. गावात पुण्यातुन आलेले दोन पक्षीमित्र भेटले. त्यांच्या गळयात लांब तोफ वजा कॅमेरे आणि दुर्बिणी लटकत होत्या. अधुन मधुन ते दुर्बिण डोळ्यांना लावत लावत डाव्या रानात शिरले. रान पक्षी निरिक्षणासाठी छान आहे. तुरळक झाडी, एक लहान ओढा आणि ओढ्याकाठची गर्द झाडी.
|
|
ते पक्षिमित्र आणि आम्ही डोंगरमित्र. ते पक्षी पहायला गेले तसे आम्ही डोंगर चढायला सुरुवात केली. मस्त धारेवरुन थेट वर छातीवरची वाट ! उगाच वाटेचा इकडे तिकडे फिरत फिरत जाण्याचा प्रकार इथे नाही. ३०-३५ मिनिटात धारेच्या वरच्या भागात आम्ही पोहोचलो. वाटेवर वाळलेली कारवी होती. अचानक एक पर्जन्यशिल्प दिसले. एक मारुती आमच्या वाटेवर ठाण मांडुन बसला होता. एका पर्जन्यशिल्प कातळ दगडावर कोणी गावकऱ्याने मारुती शेंदराने रंगवला होता. या इथुन खालचा नजार फार सुंदर दिसत होता. दोन्ही बाजुस पदरात जंगल होते. जंगलात काही कौलारु घर होती. त्या कौलारु घरांकडे जाणाऱ्या वाटा झाडीखाली लपल्या होत्या. आम्ही मारुतीच दर्शन घेऊन वरची वाट पकडली. १०-१५ मिनिटात सपाटीवर येउन पोहोचलो. आडवी वाट घेऊन कड़्यावरच्या वाघजाई पर्यंत पोहोचलो. निरव शांतता होती. वरच्या भागात असलेल्या रानातुन कुणी पक्षी शीळ घालत होता. वाघजाई चा तांदळा एका दगडी कोरिव देवळीत ठेवला होता. देवळी एक मोठया गोल पाषाणातुन कोरुन बनवली आहे. एका बाजुला खोर दरी आहे. इथल्या उदबत्या संपलेल्या होत्या. देवळीच्या आजुबाजुला तीन चार उदबत्या सापडल्या. देवीसमोर उदबत्या लावुन आम्ही अर्धा तास शांत बसलो. या डोंगरावर पुन्हा येऊन वरच्या भागात फिरण्याचा भविष्यातला प्लॅन करत, न्याहारी उरकुन आम्ही परतीची वाट पकडली.
|
|
|
|
|
|
10. Waghjai, Walen, Pune district, Maharashtra, India |
|
|
|
|
|
11. Firangai of Nanoli, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
एकदा असाच फिरंगाई ला गेलो होतो. सोबतीला पुण्यातला मित्र अनिकेत आपटे होता. डोंगर चढलो. वाट सोपी आहे. कड़्यातील पाण्याच्या टाक्यात डोकावुन पाहिले. लेण्यात फिरंगाईचे ठाणे आहे. तेथे निरव शांतता आणि गारवा होता. जणु वेळ स्तब्ध झाली होती. तेवढ्यात गावातले वयोवृद्ध तुकाराम मनोहर लोंढे डोंगर चढुन आले. पुजा अर्चा झाली. एका बाजुला बसुन त्यांनी एकटेच त्यांचे मोठया आवाजात गायन केले. देवीचे गुणगान होते ते. त्या बरोबर त्यांनी बरोबर असलेले लहान ढोलक वाजवले. मैफिल अर्धा तास चालली. काही छायाचित्र काढली. एवढ्यात भिंतीवरच्या घड़्याळाकडे लक्ष गेले. घड़्याळ बंद पडले होते. पटकन कॅमेऱ्याच्या फ्लॅश मधले बॅटरी सेल बाहेर काढले. घड़्याळात ते टाकले. घड़्याळ चालु झाले. थांबलेली वेळ पुन्हा सरकु लागली. झटके देत काटे फिरु लागले. देवीच्या पाया पडुन आम्ही डोंगर उतरलो. घरी येऊन संदर्भ शोधले. पुणे-सोलापूर रस्त्यावर कुरकुंभ नावाचे एक गाव आहे. डी.डी. कोसंबी यांनी त्यांच्या "Myths and Reality" या शोध निबंधात नमूद केले आहे की, "कुरकुंभ गावाची देवी फिरंगाई देवीची इतर देवळे सासवड जवळ हिवरे आणि देहू लष्करी कोठारांजवळ नाणोली येथे बौद्ध लेण्यात आहेत. फिरंगाई देवी तीन बहिणींपैकी एक बहीण आहे. तुळजापूरची देवी आणि राशींनची अंबाबाई या फिरंगाईच्या दोन बहिणी आहेत. पुणे -सोलापूर रस्त्यावर कुरकुंभ या दुर्लक्षित गावात मध्ययुगीन मंदिरात देवीची पूजाअर्चा केली जाते. देवळात एका न्हावी समाजातील उपासकाच्या पादुकांची पूजा केली जाते. या उपासकाने आपले बलिदान् दिल्याची कथा सांगितली जाते.
|
|
डोंगराच्या माथ्यावरच्या देवळात् देवीचा तांदळा आहे. देवळात् न्हावी समाजाला मान् आहे. पठारावर आजही क्षुद्राश्म आढळतात. ओढ्याजवळ, धोंड गावाकडे जाणाऱ्या देवीच्या पालखीच्या वाटेवर सुद्धा क्षुद्राश्म आढळतात. हे गाव नक्कीच प्राचीन वाटांवर वसलेले असावे. पण येथे फिरंगाई देवी पहिली देवता नाही. पठाराच्या पूर्व टोकाला एक जीर्ण देऊळ् आहे. या लहान देवळात झणझणी देवी आहे. लहान देवळासमोर मोठा दीप स्तंभ आहे. झणझणी देवीची पूजा माळी समाजातील लोक करतात्. या भागातील् धर्माडी आणि कुर्माडी या आज् अस्तित्वात नसलेल्या गावातील लोकांची झणझणी मुख्य देवता होती. कोणत्या तरी आक्रमणात या गावातील लोकांचे जीव् गेले. पठाराच्या या भागात बरेच सुक्षाश्म आढळतात. देवीची पालखी वेताळाच्या देवाजवळ थांबते. पण देवी आणि वेताळाचे एकमेकांशी असलेले वैर् पहाता, येथे कदाचित आधी वेगळी देवता असावी. नाणोली गावाजवळ सुद्धा खूप सुक्षाश्म आढळतात. येथे प्राचीन मार्ग होते. या लेण्यात बौद्धांनी लेणे बनविण्या आधी कोणीतरी आदिम देवता असावी. नंतरच्या काळात या आदिम देवतेच्या आठवणीत फिरंगाईची प्रतिष्ठापना झाली”. असावी.”नाणोलि चा संबंध् नाणा या शब्दाशी असावा. नाणे घाट, नाणे मावळ या शब्दांमध्ये सुद्धा नाणा म्हणजे पैशांच्या नाण्याचा संदर्भ दडला आहे. नाणोलीत कदाचित नाण्यांच्य संबंधित काही काम केले जात असावे. "नाणा" हे कुशाण राजांच्या काळातला एक शब्द आहे. "नाणा" नावाची त्यांची एक देवी होती. पैश्यांच्या नाण्यांवर तीची मुद्रा छापलेली होती. या शब्दाचा वापर आपण आता कॉइन्स (धातुच्या) नाण्यांना संबोधित करण्यासाठी सर्रास वापरतो.
|
|
|
|
|
|
12. Bapdev deity, Valvan, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
प्राचीन व्यापारी मार्गावरच एक महत्वाच गाव लोणावळा. घाट चधुन आल्यावर पठारी प्रदेशालिकडे असलेला पडाव. इंद्रायणीच्या काठीचा पडाव. पन उन्हाळ्यात नदीला त्या काळात पाणी नसाव. कुठुन पाणी मिळत असेल त्या व्यापारी तांड़्यांना ? त्यांच्या मालवाहू बैलांना, खेचरांना ?. कोड सोडवण्याचा आम्ही मित्र मंडळींनी बराच प्रयत्न केला. पडाव काही सापडला नाही. एकदा दुपारची उपनगरिय रेल्वे पकडुन लोणावळा गाठल. स्टेशन वर कातकरी बायका रान फळांचे वाटे घेउन बसतात. जांभळ, करवंद, जांब आणि आंबोळ्यांची आंबट तुरट चव पिशवीत भरली. येथील रेल्वे कॉलनी फार सुरेख आहे. शांत रस्त्यांवरुन कॉलनीतुन एक-दिड किलोमीटर ची चाल आहे. मधल्या गर्द झाडीत उंच झाडांवरचे फणस काढण्याचा उद्योग काही कातकरी करत होते.
|
|
त्यांनी त्या झाडाला दोन बांधला होता. डोंगर चढताना जसा कधी कधी दोर वापरतात तसा. एक एक करत फणस झाडावरुन उतरत होते. थॊडा पुढे गेल्यावर वळवण गावाच्या वेशीवर येऊन पोहोचलो. इथे नवे करकरित देउळ आहे. इथल्या बंगलेवाल्यांच्या वर्गणीतुन देऊळ एकदम पॉश डेव्हलप झाले आहे. कुंपणाच्या आत गेलो. देव पाहिला. देव जुना पण देऊळ नवे. बाहेर प्रचंड मोठ्या क्षमतेची कातळात कोरलेली टाकी आहेत. देवाच दर्शन आणि पाण्याची चव घेऊन मी गावात एक फेरफटका मारला. इथले बरेच जुने अवशेष आता येथील बंगल्यांनी गिळंकृत केले आहेत. व्यापाऱ्यांचे तांडे फार वर्षांपुर्वी इथे विसावले असतील. त्यांची आठवण काढली आणि मी त्यांचा पडाव सोडला. रेल्वे कॉलनीची शांत नागमोडी वाट पकडुन स्टेशन गाठले. वाटेत मगाशी येताना दिसलेले फणस आणि त्यांना उतरवणारे कातकरी आता गायब झाले होते.
|
|
|
|
|
|
13. Dhak Bhairi, Raigad district, Maharashtra, India |
|
|
आठ एक वर्ष झाली असतील. मी आणि माझा तळेगावचा जुना मित्र प्रतिक पाध्ये आणि अजुन दोन मित्र दसऱ्याला ढाकला गेलो होतो. जांभुळवाडीत गाडी लावुन तासाभरात पदरातल्या रानातुन आम्ही गुहेच्या कड़्या खाली पोहोचलो. आमच्या बरोबरचे इतर दोघे कडा पाहुन घाबरले. त्यांना थोडा खाऊ देऊन आम्ही त्यांना खालच्या गुहेत थांबायला सांगितले. दिड दोनशे फुट उभ्या कड़्यावर चढत वाश्यापाशी पोहोचलो. वरच्या टप्यात एक सहा फुटी वासा वीत भर खड़्यात ठेवलेला आहे. हा वासा गदा गदा हलतो. वरुन तो दोरांनी बांधुन ठेवला आहे. वाश्याला कसेबसे पेर होते. या पेरांवर पाय ठेवत या झुलत्या वास्यावर कसरत करत वरुन सोडलेल्या दोरांच्या सहाय्याने हातावर पुर्ण शरीर उचलत वर चढावे लागते. दोरांना गाठी आहेत. एक हात गाठीवरच्या दोराला धरायचा आणि शरिर एका हातावर वर ढकलायच. तो पर्यंत वाश्यावर पाय डुगडुगत ठेवायचे. खाली खोल दरी. एक टप्पा आऊट. कसेबसे वर चढलो. देवाला पाया पडलो. थोडा खाऊ खाल्ला. माकड गोळा झाली. इथल्या अदभुत टाक्याच पाणी प्यायलो. टाक्याच्या तळ्यातली चकाकणारी भांडी पाहिली. अचानक कडा चढुन दोन पांढ्ऱ्या टोप्या वर चढुन आल्या. टोप्यांच्या खाली माणस होती. पुजेच सामान आल. पाहुणे उंबऱ्याचे होते. आम्ही यजमान होतो, ते पाहुणे. चार गप्पा झाल्या. आम्ही चिंचवड तळेगावचे शहरी आणि ते नवलाख उंबऱ्याचे गावकरी. देवाऱ्याची स्वच्छता झाली. पुजाअर्चा झाली. नवलाख उंबऱ्याच्या गावकऱ्यांचा ढाक च्या भैरीवर फार जीव आहे. जुनी परंपरा आहे. डोंगररांगेच्या एका टोकाला टाकवे तर दुसऱ्या टोकाला घाट्माथ्यावर ढाक चा भैरी आहे. टाकवे ला नदीपल्याड नवलाख उंबरे. गावकऱ्यांनी जागृती केली.
|
|
देवाच्या तांदळ्यावरुन शेंदराच कवच काढलं. देवाला मुळ रुप आलं. गावकऱ्यांबरोबर गप्पा झाल्या. देवाची महिती एकमेकांना ऐकवली गेली. प्रतिक ने कबुल केले. अवघड इंजिनिअरिंग ची परिक्षा उत्तीर्ण होण्यासाठी त्याने देवाला साकड घातल्याची कबुली. मी पण देवाला दोन चार आव्हान सांगितली. गावकरी चौथी पास होते. ते आमच्यावर हसले. भैरी असे काय वाटेल ते देत नाही. कष्ट आपल्यालाच कराव लागतात. देव फक्त पाठ राखतो. असे गावकरी बोलले. समजुतदार होते ते. निघतो आम्ही असे म्हणल्यावर त्यांनी आमची वाट आडवली. देवाचा प्रसाद त्यांनी चुलीवर शिजवायला ठेवला होता. प्रसाद घेतल्याशिवाय जायच नाही असा आग्रह झाला. उगाच देवाचा प्रसाद नाकारायला नको असा आमच्या मनात विचार आला. कडा सुखासुखी उतरायचा होता आम्हाला. प्रसाद खाउन जातो असे आम्ही मान्य केले. आमचे दोन मित्र मात्र खालच्या गुहेत भुकेने व्याकुळ झाले होते.
गरम गरम आमटी भात खाल्ला. प्रतिक ने आमटीत टाकायला साखर मागितली. गावकऱ्यांनी त्याचे आडनाव विचारुन साखर प्रेमाने दिली. आमटी भाताच्या दोन तीन फेऱ्यांनंतर गोड साखर भात ताटात आला. ताट कुठली ? इथलीच टाक्यातली. स्वयंपाकाची सगळी भांडी टाक्यातली. माकडांनी भांडी पळवुन नेऊ नये म्हणुन भांडी टाक्याच्या तळात ठेवतात. साखर भात खाऊन देवाला पाया पडुन आम्ही गावकऱ्यांचा निरोप घेतला. त्यांचा मंत्र आज सुद्धा माझ्या डोक्यात राहिला आहे. " भैरी असे काय मागाल ते असच देत नाही. कष्ट आपल्यालाच कराव लागतात. देव फक्त पाठ राखतो." पण मी तुम्हाला सांगतो. "अस काही नसत. हा भैरी खुप पावरफुल आहे. कडक आहे. मनातुन जे मागाल ते तो देतो. थोडे कष्ट आपल्याला घ्यावे लागतात."
|
|
|
|
|
|
14. Waghjai deity, Gahunje, Pune district, Maharashtra, India |
|
|
गहुंज्याची वाघजाई
शेलारवाडीच्या डोंगरावर असलेल्या लेणी पहायला गेलो होतो. लेण्याकडे येणाऱ्या वेगवेगळया वाटा कोणत्या याचा अभ्यास करताना, मागच्या बाजुला पश्चिम दिशेला एक वाट आहे असे कळले. या वाटेवरुन खाली उअतरलो. खिंडीतुन मागच्या रानातुन वाट आहे. वाटेत त्या काळातल्या वाटसरुंसाठी खोदलेले पाण्याचे टाके आहे. पाणी आता वापरात नाही. टाके उघडे अस्ल्याने त्यात पानगळ तरंगत होती. कधी काळी बुद्ध अनुयायी येथे पाणवठया वर विसावले असतील. गावातुन आणलेली भिक्षा त्यांच्या उदरात गेली असेल. लेण्यांमध्ये रहाणारे भिक्षुक डोंगराच्या चहुबाजुला असलेल्या विविध गावात भिक्षा मागायला जात असावेत. ही वाट गहुन्ज्याची, तिकडे पल्याड शेलारवाडीची तर अजुन पल्याड सोमाटण्याची, अशा वाटा आहेत. पाण्याच्या टाक्यावर थोड विसावलो.
. |
|
इथली सावली थोडी अंगिकारल्यावर, एका सपाट धारेवरुन मी पायथ्याला पोहोचलो. इथे निरव शांतता होती. या शांततेत वाघजाई चे ठाणे आहे. डोंगरावर महादेवाने बस्तान मांडले असल्याने इथे कदाचित वाघजाईला खाली पायथ्याशी रहावे लागले असावे. वाघजाईचे दर्शन घेऊन मी पुन्हा डोंगर चढलो. पुन्हा पाण्याचे टाके, पुन्हा डोंगरमाथा आणि पुन्हा महादेवाची शांत थंड विस्मयकारक गुंफा. महादेवाच्या गुंफेबाहेरच्या थंड पाण्याच्या टाक्यात डोकावुन पाहिले. इथे ठेवलेल्या तुटलेल्या बादलीने खोल टाक्यातुन पाणी काढले. गार वाटल्यावर चैत्यगृहात विराजमान झालेया महादेवाच्या पिंडीचे दर्शन घेतले. इथल्या विहारात डोकावुन पाहिले. या गुहेच्या कातळात मुरलेला तत्वज्ञानाचा एखादा पाझर दिसतोय का ते शोधले. तत्वज्ञानाचा पाझर शोधता शोधता, १८०० वर्षांपुर्वी इथे रहाणारे बौद्ध भिक्षुक दिसले, धेनुकाकट गावातील शेतकऱ्याची बायको जीने या चैत्यासाठी दान दिले होते ती भेटली, पंधराव्या शतकात आलेले शैव अनुयायी भेटले.
|
|
|
|
|
|
15. Ghatshila, Wadebolhai, Pune district, Maharashtra, India |
|
|
वाडेबोल्हाई ला जायच ठरवल. मुख्य देवळात देवीच दर्शन घेऊन, जुन्या घटशिळेला शोधत शोधत एका माळावर येऊन पोहोचलो. दामोदर धर्मानंद कोसंबींच्या शोध निबंधात् या शिळेच वर्णन वाचल्ं होत. हा असला देवाचा प्रकार मी प्रथमच पहिला. एक् मोठी शिळा दुसऱ्या मोठ्या शिळेवर ठेवली आहे. शिळेचा आकार सात फुट बाय चार फुट असावा. उंची २.५ फुट् असावी. वरच्या शिळेला पुजतात. आम्ही गेलो तेंव्हा शिळेला पातळ नेसले होते. उत्तरेकडे शिळेला दोन एका भोवती दुसर अशी वर्तुळ आहेत. कदाचित हा देवीचा डोळा असावा. वर शिळेला एक मोठा वर्तुळाकार खड्डा आहे. त्यात एक अंडाकृती दगड ठेवलेला आहे. या मुख्य खळग्याच्या आजुबाजुस लहान गोल खळगे (विवर) आहेत. यातल्या बऱ्याच् खळग्यात गोल गोटे ठेवलेले आहेत. विवर मानवनिर्मित आहेत असे वाटते. या शिळेबद्दल् काही आख्यायिका आहेत. याचा उल्लेख कोसंबींनी त्यांच्या लेखात केला आहे. बोल्हाई सर्वप्रथम इथे वास्तव्यास होती.
|
|
तीचे पाच भाऊ म्हणजे पाच पांडव नविन देवळात घेऊन गेले. दोन मुख्य शिळांच्या मध्ये सुद्धा खाचेत गोल दगड आहे. त्याला शेंदुर फासला आहे. मुळ देवी ही खाचेतली लहान शिळा आहे असा समज आहे. अशी विवर असलेली शिळा पुजण्याची प्रथा फक्त वाडेबोल्हाई च्या माळावर आहे असे नाही. अशा शिळा या भागात इतरत्र सुद्धा आहेत. विवर का केली असावीत. त्यात लहान गोल गोटे का ठेवले असावेत यावर सुद्धा काही आख्यायिका आहेत. मात्र नक्की कारण आज आपल्याला माहित नाही. गोटे विवरात गोल फिरवुन होणारा ध्वनी आणि त्यातुन होणारा ध्वनि संपर्क या मुळे शिळेला देवपण् मिळाले असावे असे म्हणतात. पण् या सर्व आख्यायिका आहेत्. या विवरयुक्त शिळेची मुळ संकल्पना आणि त्या मागची श्रद्धा आज काळाच्या पडद्या आड गेली आहे. या सर्व प्रकारतील खरे गुढ काही औरच आहे. युरोप, अफ्रिकेत सुद्धा खुप ठिकाणी अशा प्रकारची वर्तुळ, विवर असलेल्या शिळा आढळतात. तेथील् अभ्यासकांनी याचे विविध् तर्क मांडले आहेत. विवरयुक्त घट शिळेचे गुढ कोडे कदाचित कधीच उलगडणार नाही.
|
|
|
|
|
|
16. Ghatshila, Wadebolhai,, Pune district, Maharashtra, India |
|
|
|
|
|
17. Ambabai, Taje/Pimpaloli, Maval Tehsil, Pune district, Maharashtra, India |
|
|
लोणावळ्याला रेल्वे ने जाताना गाडीने कान्हे रेल्वे स्थानक सोडले. डाव्या बाजुला इंद्रायणी नदी दिसु लागली. इंद्रायणी नदीच्या तीरावर असलेल्या कामशेत स्थानकावर गाडी थांबली. गावकरी मावळे टोपीवाले, दुधवाले, कामकरी यांची गाडीत चढताना एकच लगबग झाली. दुधाचे १५-२० पिंप गाडीत चढले. गाडी हलली. इंद्रायणीच्या तीरातीरावरुन वेगात जाऊ लागली. गाडीच्या डाव्या बाजुला आता विसापुर आणि लोहगड ची जोडगोळी दिसणार या अपेक्षेने माझी नजर बाहेत भिरभिरु लागली. मावळातील शेत, रस्ते, रस्त्यावरच्या गाड़्या, रेल्वे फाटक, तिथे थांबलेल्या गाड़्या यांचे चलचित्र खिडकीत झपाट्याने सरकु लागले. दुरची शेत हळु तर जवळची शेत जोरात पळु लागली. या सगळ्या वेगवान चलचित्रात अचानक क्षणभर एका झुडुपात शेंदुर फासलेला देव दिसला.
|
|
कोणी गावकरी त्याची पुजा अर्चा करत होता. कोण होता तो देव ? उत्तर शोधण्यासाठी पंधरा दिवसांनी पुन्हा गाडी पकडली. कामशेत ला उतरलो. अंदाज करत वाट पकडली. पाऊण तास चालल्यावर त्या झुडुपाजवळ पोहोचलो. झुडुपात गारव्याला देव दिसला. देव म्हणजे एक ४ फुट उंच शिळा होती. त्यावर पान, चांदण्या कोरलेल्या होत्या, वर वीरगळींवर असत तसा एक घुमट कोरला होता. समोरच्या बाजुला चौकोनी कोंदणात देवाच्या चेहेऱ्यासम दगड लावलेला आहे. देवाला पाया पडुन पुढे ताजे गावातुन मळवली गाठल. एका गावकऱ्याकडुन कळाल, अंबाबाई आहे ती शिळा. ताजे, पिंपळोली आणि खामशेत गावांच्या वेशीवरची देवी. २०-२२ कि.मी. चालुन परतीची गाडी पकडण्यासाठी मळवली गाठलं.
|
|
|
|
|
|
|
References :
1. Cave temples of India, London, 1880, Fergusson James and Burgess James.
2. Myths and reality -= D.D. Kosambi.
3. Buddhist architecture of western India, 1981, S. Nagraju.
4. Burgess James and Inderaji Pandit Bhagavanlal, Inscriptions from the cave temples of western India, ASWI X, London, 1881.
|
|
|
|
|